Featured image for post: वाईजवळची पालपेश्वर लेणी
2 min read

वाई. पश्चिम महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध गाव. कृष्णातीरावरचे एक टुमदार शहर. खूप पूर्वीपासून या गावाला महत्व आहे. आणि माझे बालपण येथे गेल्याने माझ्या दृष्टीने फारच. वाईला जसा कलेचा, इतिहासाचा ठेवा लाभला आहे तसाच निसर्गसौंदर्याचा ठेवा सुद्धा भरपूर आहे. परिसरात अनेक किल्ले, धरणे, आणि लेणी आहेत. त्यातीलच एक पालपेश्वर.

शहराच्या उत्तरेला ६ किमी अंतरावर लोहारे गावाजवळच्या डोंगरात या लेण्या खोदल्या आहेत. मूलतः ही लेणी बौद्ध-हीनयान पंथाच्या असून नंतरच्या काळात तेथील स्तूप हे शिवलिंग समजून पालपेश्वर हे नाव रूढ झाले.

कसे जाल : वाई मध्ये प्रवेश करण्यापूर्वी MIDC ला जाणाऱ्या रस्त्यावर , लोहारे नावाचे गाव , गावातल्या हापशी पासून एक पाणंद शेताकडे जाते , शेताच्या कडेने जाऊन पलीकडच्या डोंगर रांगेत दक्षिण टोकाला निम्म्या अंतरावर झाडीमध्ये लेण्याच्या खाचा अस्पष्ट दिसतील, त्यांच्याकडे नाक करून टेकडी चढून जावे. लोहारे गावापासून सुमारे ३० मिनिटात लेणी गाठता येतात. येथे एकूण ५ वेगवेगळ्या गुहा आहेत.

लेणी क्र १ :  उजवीकडच्या भिंतीमध्ये कोरलेल्या ४ मूर्ती, नक्की कोणाच्या मूर्ती आहेत ते सांगता येत नाही, परंतु लक्ष्मी सरस्वती विष्णू गरुड यांच्या त्या असाव्यात, लक्ष्मीच्या हातामध्ये बांगड्या कोरलेल्या कळतात (संदर्भ : भटकंती अपरिचित साताऱ्याची… आदित्य फडके). मूर्तींच्या शेजारीच थोड्या उंचीवर  चौथरा, अन त्याच्या वर पोट माळा आहे.

लेणी क्र २ : या लेण्यामध्ये आत आणि बाहेर असे मिळून २ विहार आहेत, पावसाळ्यात दोन्ही विहारात पाणी भरते, आतील बाजूस सुबक घडणीचा नंदी आणि एक शिवपिंड आहे.

लेणी क्र ३ : हे सर्वात मोठे आणि प्रमुख लेणे आहे. यामध्ये डाव्या बाजूस खिडकी युक्त १ दालन, एका खिडकीजवळ पूर्णपणे भंगलेल्या ५ मूर्ती आहेत, त्यात गणपती आणि कुठल्याशा देवीची मूर्ती ओळखता येते, मुख्य दालनात गुडघाभर पाणी कायमच भरलेले असते, बाजूला बसायचे ओटे आहेत, समोरच्या विहारात प्रचंड आकाराचा स्तूप ( उंची सुमारे ५ फुट) या स्तूपाचे रुपांतर कालांतराने शिवलिंगामध्ये झाले असावे. याच स्तुपाला स्थानिक लोक पालपेश्वर किंवा दागोबा असं समजतात, त्याच्या समोर पाण्यात एक नंदी, आणि एक मूर्ती , स्तुपाला टेकून ठेवलेला एक अंडाकृती दगड हा स्तुपाचाच एक भाग असावा.

लेणी क्र ४ : अर्धवट खोदाई, उजवीकडे पाण्याचे टाके, डावीकडे एक विहार, आत मध्ये गाळ आणि माती भरल्याने अर्धवट बुजले आहे.

लेणी क्र ५ : पाण्याचे टाके, दगड माती भरल्याने बुजून गेलेलं आहे.

इतिहास : चैत्यगृहे त्यांची बांधणी आणि स्तूप यावरून ही लेणी बौद्ध हीनयान पंथी आहेत हे समजते, लेण्यांचा बांधणी-काळ इ .स. २ रे ते ३ रे शतक, देव देवतांच्या मूर्ती, नंदी हे नंतर च्या कालखंडात आले असावेत.

शहराच्या अगदी जवळ पण शहरीकरण पासून बरेच लांब असलेल्या या गुहा अथवा लेणी फारच प्रेक्षणीय आहेत.

सहभागी भटके - अजय काकडे, अमित कुलकर्णी, स्वानंद क्षीरसागर आणि महेश लोखंडे

पालपेश्वर लेणी समूह
लेण्यांमधील मूर्ती
पालपेश्वर येथील शंकराची पिंड

Quick Actions
  • Toggle theme
  • Search content
Navigation
  • Home
  • Posts
  • Projects
  • Gallery
Social
  • X
  • Instagram
  • GitHub