Featured image for post: कैसी ही सुवेळा
2 min read

रोज घरातून बाहेर पडताना दूरवर दिसणारा सिंहगड माझी धांदल पाहून हसायचा आणि म्हणायचा “आज पण धुरात आणि घरात दिवस जाणार वाटते… ये जरा सह्याद्रीत ये. मोकळी हवा घे. मला भेटायला ये. सह्याद्रीला भेटायला ये…” मी आपले मुकाट्याने पुढे जायचो. मनात फक्त म्हणायचो “बघू या वीकेंडला”. बरेच महिने घरी बसल्यामुळे घरातलेच आता मला वैतागले होते. मी सुद्धा फारच कंटाळून गेलो होतो. त्यामुळे या वीकेंडला एक तिडीक उठली आणि बाहेर पडायचे ठरले. कोणी येवो अथवा न येवो. सगळ्यांना विचारून झाले आणि शेवटी आमच्या वाघोबाला राजगडी भेटायचे ठरले.

आयत्या वेळी “भावी घरामध्ये” व्यस्त असलेले युवराज काकडे भटकंतीमध्ये शामिल झाले आणि शनिवारी संध्याकाळी पुण्याचे धुराडे सोडले. नुकतीच पोर्णिमा झाली होती त्यामुळे रात्री राजगड चढणे फार कष्टाचे होणार नव्हते. शनिवार-रविवारी राजगडवर असंख्य भटक्यांची गर्दी आणि जत्रा असणार हे माहीत होते. गुंजवणेकडून चढणारी मंडळी त्यामानाने जास्तच. म्हणून आम्ही पालीचा राजमार्ग जवळ केला आणि चंद्राच्या लख्ख प्रकाशात चढून वर गेलो. पाली दरवाज्यात बसून मावळावर विखुरलेल्या चांदण्यात आणि हेमंताच्या धुकट दुलईत अलगदपणे लुप्त होणारी गावे पहात थोडा वेळ काढला आणि गडावरच्या जत्रेत शिरलो. कशीबशी राजवाड्याच्या जागेवर पाठ टेकायला जागा मिळाली आणि आजूबाजूच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करीत डोळे मिटून घेतले.

रामप्रहरी कोणीतरी हलवून जागे करावे तशी जाग आली. रात्रीच्या थंड वाऱ्याने सगळ्यांना गप्पगार केले होते. काही मंडळी रात्री जास्त झाल्याने थंड पडली होती. या दिखाऊ भटक्यांची फार चीड येत होती पण आम्ही दोघे त्या २०-२५ “टल्लीन” लोकांसमोर मूर्ख ठरत होतो. असो. पद्मावती मंदिराच्या ओसरीवर थाटलेल्या हॉटेलात चहा पिऊन होतोय तोपर्यंत पूर्वेला रंग उमटू लागले होते. धुक्यातून डोके वर काढून नारायणाच्या स्वागताला ती तयार होत होती. जरीकाठाचा सुरेख हिरवा शालू ल्यायलेली ती, तांबूस सोनसळी रंगांच्या पुढे फारच उठून दिसत होती. ही सुवेळा. राजगडची सुवेळा माची. तडक सुवेळा माचीची वाट पकडली. झपाझप पावले टाकून चिलखती बुरुज गाठला तसे सुवेळाच्या मागून सूर्यदेव उंचावून राजगडाला जागे करत होता. मागे वळून पाहिले तर संपूर्ण राजगड सोन्याने मढला होता… याजसाठी केला होता अट्टाहास… डॉ. पराडकर यांच्या गडपुरुष मध्ये वाचलेले सुवेळाचे वर्णन अगदी डोळ्यासमोर होते…

“सकाळी सर्वांच्या अगोदर शिवबास जाग आली. जवळच निजलेल्या सोबत्यांस तसेच निजू दिले अन अंगाभोवती घोंगडी घेऊन कड्याच्या धारेवर येऊन उभा राहिला. झाडांच्या गर्दाव्यातून पक्षीगणांनी आपले आवाज शिगेला पोहोचवले. धुक्याचा पडदा विरळ झाल्यागत वाटला. त्याचक्षणी उगवलेलं ते तान्हुलं बिंब, पर्वताच्या उगवतीकडल्या माचीच्या अंगावर तांबडी, नारंगी प्रभावळ. आणि या सगळ्याला जिवंतपणा देणारं ते हलतेडोलते पांढरेशुभ्र धुके. सारं कसं एकातएक मिसळलेले. सुष्टादुष्टांचा विसर पाडणारं.. तुष्ट करणारं… त्याच क्षणी शिवबा वळला अन् त्यानं हाकारलं, “बाजीकाका, येसाजी, तानाजी, गोदाजी, संभाजी.. उठा… लवकर येथे या.. उठा!!! एका हाताने त्यांना थोपवत आणि दुसरा हात सूर्यबिंबावर रोखत शिवबाच्या मुखी विधिलिखित उमटलं… कैसी ही सुवेळा!! ही शुभवेळा याच माचीच्या साक्षीने आम्ही अनुभवली… या माचीचे आम्ही ऋणी लागतो… या ऋणातून उतराई होणेसाठी आम्ही मनी योजिले आहे की या माचीचे नामकरण ‘सुवेळा’ ऎसे व्हावे. श्रींच्या राज्याच्या प्रतिएक दिवसाची सुरवात या सुवेळेआडून भगवान आदित्यचे दर्शन घेताना व्हावे.”

Quick Actions
  • Toggle theme
  • Search content
Navigation
  • Home
  • Posts
  • Projects
  • Gallery
Social
  • X
  • Instagram
  • GitHub